अकोला: भारतीय जनता पार्टीने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदा विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी बहाल केली. यावेळी पक्षाकडून चेहरा बदलला जाईल, अशी इच्छुक उमेदवारांच्या गोटात चर्चा होती. तसे न झाल्यामुळे नाराज इच्छुकांकडून आता सक्षम अपक्ष उमेदवारांची शोधाशोध केली जात असून, २०२४ मधील विधानसभा निवडणुकीचे ‘लक्ष्य’ साधण्यासाठी अपक्षांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर भाजपने चारही विधानसभा मतदारसंघात स्वबळावर मुसंडी मारली. यामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून आ. गोवर्धन शर्मा यांनी विक्रम रचत सलग पाचव्यांदा निवडून आले. आ. शर्मा यांचे पक्षातील वजन लक्षात घेता यंदा त्यांच्याविरोधात कोण-कोण उमेदवारी अर्ज सादर करतो, याकडे अनेकांचे लक्ष होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या असता, कोणी उघडपणे दावेदारी सादर केली तर कोणी पक्ष काय निर्णय घेतो, यावर विसंबून होते. पक्षाने तब्बल सहाव्यांदा आ. शर्मा यांना उमेदवारी बहाल करताच इच्छुकांच्या गोटात नाराजी पसरली. या मतदारसंघातील राजकीय, सामाजिक व जातीय समीकरणे लक्षात घेता यंदा कोणत्याही परिस्थितीत आ. शर्मा यांचा पराभव झाल्यास २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून निश्चितच दुसऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असा कयास बांधत काही नाराज इच्छुकांनी अपक्ष उमेदवारांना साकडे घातल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपमधीलच काही इच्छुक पडद्याआडून खेळी करीत असल्याची चर्चा खुद्द पक्षातच रंगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा उद्या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. भाजपमधील अंतर्गत धुसफूस पाहता उद्या कोणता सक्षम दावेदार अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सोशल मीडियावर पोस्ट व्हायरलआ. गोवर्धन शर्मा यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी दुसºया दावेदाराला उमेदवारी मिळाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला होता.