- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवसही धक्कादायक राजकीय घडामोडींनी गाजला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली उमेदवारी मागे घेत काँग्रेसच्या बंडखोर नेत्याला उमेदवारी जाहीर केली, तर याच मतदारसंघात शिवसेनेची तसेच बाळापूर, मूर्तिजापूर व अकोटमध्येही स्वपक्षाच्या विरोधातील नाराजी उमेदवारी अर्जाच्या रूपाने प्रकट झाली. आता ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यामधील किती बंडोबांना थंडोबा करण्यात नेते यशस्वी होतात, यावरच प्रत्येक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.अकोला पश्चिम हा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ ठरला. काँग्रेसने साजीद खान पठाण यांना उमेदवारी दिली; मात्र या उमेदवारीच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मदन भरगड यांनी बंड पुकारात थेट वंचित बहुजन आघाडीचा हात पकडला आहे. येथे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली इमरान पुंजानी यांची उमेदवारी मागे घेऊन अॅड. आंबेडकरांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राची ओळख करून दिली. येथे भाजप उमेदवारांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेचे नगरसेवक व शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपासमोरच आव्हान उभे केले आहे.बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक चुरस राहील, असे स्पष्ट संकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मिळाले आहेत. येथील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर, राष्टÑवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून सेनेच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. येथील विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून ‘वंचित’विरोधातच बंड पुकारले होते. त्यात शेवटच्या दिवशी डॉ. संतोष हुशे आणि गजानन दांदळे यांच्या नावाची भर पडली. ‘वंचित’कडून हुशे यांच्या नावाची चर्चा अकोट मतदारसंघासाठी होती; मात्र हुशे हे बाळापूरसाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी बाळापुरात अर्ज दाखल केला. काँग्रेस आघाडीत समाविष्ट असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुकाराम दुधे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी धर्माला आव्हान दिले आहे.अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांची उमेदवारी रिंगणात आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेचे महादेव गवळे व भाजपचे तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी खिराडे यांनी उमेदवारी दाखल करून राष्टÑवादीच्या उमेदवाराविरोधात नाराजी स्पष्ट केली आहे. अकोट मतदारसंघात अनिल गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गावंडे हे महिनाभरापूर्वीच शिवबंधनात अडकले होते, हे विशेष!या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींसमोर अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मंगळवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.