अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. त्यामध्ये पाचही विधानसभा मतदारसंघात १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ आॅक्टोबरपर्यंत) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात १०७ उमेदवारांनी १५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये करण्यात आली. छाननी प्रक्रियेत १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मतदार यादीत नाव नसल्याने अकोट मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख निसार शेख गुलाब यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला, तसेच बाळापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले चंद्रशेखर चिंचोळकर व प्रकाश तायडे यांनी काँग्रेस पक्षाचा ‘ए-बी फॉर्म’ सादर केला नसल्याने दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले. तर याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार सविता धाडसे यांच्या अर्जावर सूचकांची नावे कमी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. अकोला पश्चिम मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार संतोष इंगळे यांचे मूर्तिजापूर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव आहे; मात्र मतदार यादीत नाव असल्याची प्रमाणित प्रत त्यांनी सादर केली नसल्याने, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. तर मूर्तिजापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार मेवालाल देवीकर यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा सादर केला नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला.