अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी अकोला मतदार संघात मतदान होत असून, सकाळीच मतदानास शांततेत व उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत असून, अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सपत्नीक त्यांचे मुळ गाव पळसो-बढे येथे मतदान केले. त्यांच्या कुटुंबियांनीही यावेळी मतदान केले. त्यांच्यासोबत अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनीही सपत्नीक मतदान केले. अकोला पश्चिम मतदार संघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनीही शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
गुरुवारी सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान यंत्र सुरु न होण्याच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५६ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाचा पारा कमी असल्याने सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.