Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:44 AM2019-09-19T11:44:41+5:302019-09-19T12:01:42+5:30
भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे.
विजय शिंदे
अकोट - अकोट मतदारसंघात सध्या अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या समोरील अडचणी कशा वाढविता येतील याचा प्रयत्न स्वपक्षासह विरोधकांनीही जोरकसपणे केल्यामुळे सध्या हा मतदारसंघ अकोल्यात सर्वाधिक चर्चेत आहे.
भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे. मात्र युती व आघाडीने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन स्वबळाची केलेली चाचपणी केली असली तरी आघाडीत बिघाडीचे चिन्हे नाहीत मात्र युती कधीही धोक्यात येऊ शकते असे संकेत आहेत. यामुळेच भाजप- शिवसेना उमेदवाराच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या आठवडयात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला तर शिवसेना महिला मेळावा घेतला आहे. युती झाल्यास कोणते उमेदवार द्यावे आणि युती न झाल्यास कोणते उमेदवार द्यावे यावर नजर ठेवून काँग्रेस वंचित आघाडी यांनी सावध पवित्रा घेतलेला दिसत आहे.
अकोट-तेल्हारा विधानसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, भाजपा पाठोपाठ शिवसेनेनेही हा सूर आळवला आहे. दूसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडी यांनीसुद्धा स्थानिक उमेदवारावर भर देण्याची रणनीती सुरू केली.
गत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपाने या ठिकाणी विजय मिळवला होता. काँग्रेस दुसऱ्या, भारिप-बमसं तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी युती होण्याचे संकेत मिळाल्याने पूर्वीप्रमाणे या मतदारसंघावर शिवसेना दावा करीत आहे. दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. तर यावेळी काँग्रेस राकाँ आघाडी होणार असल्यामुळे येथून या पक्षाची ताकत वाढणार आहे. दरम्यान, या मतदारसंघात बहुजन धर्मनिरपेक्ष अशा विचारधाराचे समीकरण बसविणारी वंचित बहुजन आघाडीचे मतदारसंघात सर्वाधिक जि.प. व पं.स. सदस्य तसेच अकोट व तेल्हारा पंचायत समिती एकहाती सत्ता नुकतीच संपुष्टात आल्याने काही प्रमाणात या पक्षाची यावेळी ताकत वाढण्याचे संकेत आहेत.
अकोट मतदारसंघाची ही स्थानिक राजकीय रणभूमी पाहता मतदारसंघात मराठा, कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. शिवाय मुस्लीम, बौद्ध, माळी, बारी समाजाची गठ्ठा मते आहे. बारा बलुतेदार, हिंदी भाषिक मतदारासह अनेक छोट्या जातीसमूहाची मतेही निर्णायक आहेत. अशी सर्व मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतात, त्यांना निवडणूक जड जात नसल्याचे आजपर्यंतच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते; परंतु आता स्थानिकचा मुद्दा पुढे आल्यामुळे कुणाचं घडतंय, कुणाचं बिघडतंय, हे लवकरच कळणार आहे.