अकोला - महावितरणच्या नेट मीटरिंग एग्रीमेंटवर चार स्वाक्षऱ्या करण्यासाठी प्रत्येक स्वाक्षरीसाठी दोन हजार रुपये असे एकूण आठ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी तसेच ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा लाचखोर कार्यकारी अभियंता नितीनकुमार पवार यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराचे सोलर पॅनल बसवून देण्याचे कामकाज आहे. हे पॅनल बसवून दिल्यानंतर संबंधित ग्राहक व महावितरण कंपनी यांच्यामध्ये नेट मीटरिंगचे एग्रीमेंट करण्यात येते़ अशाच प्रकारे चार ग्राहकांच्या एग्रीमेंट फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी महावितरण कंपनीचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन कुमार नाथाबा पवार वय ५१ वर्षे याने प्रत्येक फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन हजार रुपये असे एकूण चार फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली़ मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी तडजोड केली असता चार हजार रुपयांवर व्यवहार ठरला़ त्यानंतर या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली़ मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठिकाण ठरल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता पवार याने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली़ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे़.