अकाेला: केंद्र शासन पुरस्कृत अकाेल्यातील पशुधन विकास महामंडळाचे स्थानांतरण व पेट्राेल दरवाढीच्या मुद्यावरून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी ठाकरे सरकारवर टिकास्त्र साेडले. तत्कालीन फडणवीस सरकारने पशुधन विकास महामंडळासह विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली असताना अशा प्रकल्पांना खिळ घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहे. ठाकरे सरकारचा सुडाचा प्रवास सुुरू असल्याची टीका कुळकर्णी यांनी रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतूदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली. काेराेना विषाणूचा संपूर्ण जग सामना करीत असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेनाच्या काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. त्याचे सकारात्मक परिणाम समाेर आले असून जगभरातील अर्थतज्ज्ञ भारताकडे काैतुकाने पाहत असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. २०१४ पासून ते आजपर्यंत पंतप्रधान माेदी यांनी देशाची अर्थव्यवस्था याेग्यरित्या सांभाळली असून अर्थव्यवस्थेच्या बाबतीत १३ व्या क्रमांकावर असलेला देश आता ५ व्या क्रमांकावर आल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शेतकरी व गरीबांसाठी विविध कल्याणकारी याेजनांवर काेट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, प्रसिध्दी प्रमुख गिरीश जाेशी आदी उपस्थित हाेते.