अकाेला : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची साेमवारी दुपारी एकत्रित चर्चा झाली. या चर्चेमध्ये महाविकास आघाडीबाबत कुठलाही निर्णय झाला नसला तरी ही पाेटनिवडणूक एकत्रित लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषद सर्कलच्या १४ जागांचे वाटप कसे करायचे हा कळीचा मुद्दा असल्याने चर्चेची आणखी एक फेरी हाेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे विराेधी पक्षनेते गाेपाल दातकर, सेवकराम ताथाेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमाेल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष बबलू जवंजाळ या नेत्यांनी आघाडीच्या बाबत एकत्रित चर्चा केली.
जागा वाटपाचा या सूत्रांवर मंथन
जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी ७ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर उर्वरित ७ जागांमध्ये शिवसेना आणि प्रहार या सूत्रावर चर्चा झाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते घेणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेचाही दावा कायमच हाेता असे ९ मतदारसंघ आहेत त्यामुळे उर्वरित ५ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने लढावे का? यावरही मंथन झाले त्यामुळे पहिल्याच बैठकीत काेणताही निर्णय न हाेता केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले.
महाविकास आघाडी झाली पाहिजे याबाबत सर्वच सकारात्मक हाेते. आम्ही बैठकीतील चर्चेचा गाेषवारा मंगळवारी वरिष्ठ नेत्यांसमाेर ठेवणार असून त्यानंतरच महाविकास आघाडीच्या गठणाबाबत बाेलता येईल
- आ. नितीन देशमुख जिल्हाप्रमुख शिवसेना
आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसाेबत संवाद झाला, चर्चा चांगली झाली मात्र आघाडी न झाल्यास काँग्रेसच्या बैठकीत आम्ही स्वबळाच्या तयारीचे आवाहन केले आहे. आघाडीबाबत एकमत झाले तर पक्षश्रेष्ठींसाेबत बाेलून निर्णय घेण्यात येईल.
- हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष काॅंग्रेस
जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे त्यामुळे महाविकास आघाडी हाेण्यासाठी सर्व पक्षांची मते जाणून घेण्यात आली आहेत. आज काेणताही निर्णय झाला नाही.
- संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस