अकोला : वीज ग्राहकांना अखंडित व उत्कृष्ट सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु ही सेवा देताना आपली व ग्राहकाची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामूळे आपण सुरक्षा नियमांचे पालन सातत्याने करून ग्राहकांचे प्रबोधन सुद्धा केले पाहिजे असे आवाहन अकोला परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले, ते आज विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महावितरणच्या वतीने विद्युत भवनातील आवारात आज आयोजित जनजागृती रॅलीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.घरगुती व सार्वजनिक यंत्रणेच्या विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्याकरीता ११ ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्युत नियमांचे पालन व्हावे तसेच घरगुती व सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून महावितरणच्या वतीने बुधवार १६ जानेवारी रोजी विद्युत भवन येथून विद्युत सुरक्षा जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी विद्युत भवन येथे सदर रॅलीला प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट आणि विदयुत निरीक्षक राजीव महालक्ष्मे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.यावेळी विदयुत निरीक्षक राजीव महालक्ष्मे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहाचे महत्व व त्यासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महावितरणचे कार्यकारी अभियंते गजेंद्र गडेकर, प्रशांत दाणी, प्रदीप पुनसे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, प्रभारी व्यवस्थापक गुरुमितसिंग गोसल, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, अधिकारी व जनमित्र तसेच विदयुत निरीक्षक विभागाचे सहाय्यक विदयुत निरीक्षक अजाबराव घुगे, मिलन वैष्णव, अमिता तिवारी, शाखा अभियंते रेणुका धात्रक,विनय थेटे सुद्धा उपस्थित होते.सदर रॅली सिविल लाईन चौक, हेड पोस्ट आॅफिस, अशोक वाटीका जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली, टिळक रोड, अग्रसेन चौक, कारमेल शाळा चौक, दुर्गा चौक या मागार्ने जनजागरण करीत विद्युत भवन कार्यालयाच्या आवारात समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान नागरिकांना सुरक्षा पत्रकाचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.