अकोला : वीजग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून वीज ग्राहकांना तक्रार निवारण, बिल भरणा, नवीन वीज जोडणी अशा विविध कामांसाठी मदत करणारे ऊर्जा चॅट बॉट ॲप्लिकेशन महावितरणने विकसित केले आहे.
ग्राहकांना भरवशाचा, दर्जेदार आणि पुरेसा वीज पुरवठा या मूलमंत्रावर महावितरणचे कामकाज सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऊर्जा चॅट बॉट उपयोगी ठरेल. ऊर्जा चॅट बॉटमुळे ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध असल्याने त्यांना सोईनुसार सेवेचा लाभ घेता येईल.
काय आहे उर्जा चॅट बॉट?आर्टीफीशीयल इंटेलीजंन्सवर आधारीत 'ऊर्जा "हे चॅट बॉट महावितरणने विकसित केले आहे. महावितरणच्या संकेतस्ळावर ते उपलब्ध आहे. महावितरणशी संबंधित ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी या चॅट बॉटमध्ये सुविधा आहे. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट बॉटद्वारे दिली जातात व त्यातून ग्राहकांना मार्गदर्शन होते. ग्राहकांना त्वरित प्रतिसाद तसेच जलद आणि कार्यक्षम सुविधा प्रदान करणे ही या चॅट बॉटची वैशिष्ट्ये आहेत.
कसा कराल वापर?महावितरणच्या उर्जा चॅट बॉटचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळाला भेट द्या. संकेतस्थळ उघडताच पहिल्या पानावर उजव्या बाजुला अगदी खालच्या भागात संगणक किंवा टीव्ही संचासारखे एक हलणारे कार्टून दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर उर्जा चॅट बॉट उघडेल. त्यात इंग्रजी आणि मराठी भाषा निवडण्याचे पर्याय असतील. त्यातील पर्याय निवडून खाली तुम्हाला आवश्यक असलेली माहिती जाणून घेता येईल किंवा तक्रारही करता येईल.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ऊर्जा चाट बॉट या अॅप्लिकेशनमुळे वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेण्यापासून तर वीजविषयक तक्रारी,वीजबिल ऑनलाइन कुठे आणि कसे भरावे याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या ऊर्जा चाट बॉटचा वापर करावा.
- पवनकुमार कछोट, महावितरण, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ