शहरातील प्रमुख बाजारपेठ असाे वा मुख्य रस्ते तसेच गल्लीबाेळात अतिक्रमणाच्या समस्येने डाेके वर काढल्याची परिस्थिती आहे. रस्त्यालगत हातगाडी किंवा जमिनीवर विविध साहित्य विक्रीचा बाजार मांडला जात असल्याने रस्त्यातून वाट काढताना अकाेलेकरांच्या नाकीनऊ आले आहेत. गांधी राेड, टिळक राेड, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला प्रतिष्ठान, जैन मंदिर परिसर, काला चबुतरा, इंदाैर गल्ली, जयहिंद चाैक, जठारपेठ चाैक, तुकाराम चाैक, काैलखेड चाैकातून धड पायी चालणेदेखील मुश्कील झाल्याचे चित्र आहे. या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे समाेर आले आहे. सणासुदीच्या दिवसांत अकाेलेकरांना काहीअंशी दिलासा मिळावा, या उद्देशातून जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी पाेलीस प्रशासन तसेच शहर वाहतूक शाखेच्यावतीने संयुक्त अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्याचे निर्देश दिले असता, गुरुवारी या माेहिमेला सुरुवात करण्यात आली.
हाॅकर्स झाेन केले निश्चित
सिटी काेतवाली ते थेट धिंग्रा चाैक, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला, गांधी चाैकातील चाैपाटी आदी ठिकाणी हातगाडीवर विविध व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांसाठी खुले नाट्यगृहाचे आवार, भाटे क्लब मैदानात हाॅकर्स झाेन निश्चित केले आहेत. जठारपेठ चाैकातील लघु व्यावसायिकांसाठी मनपा शाळा क्रमांक ५च्या आवारात हाॅकर्स झाेन निश्चित केला आहे. याठिकाणी व्यवसाय न केल्यास साहित्य जप्त केले जाणार आहे.
जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेत्यांना अभय
जठारपेठ चाैकात भाजीविक्रेत्यांच्या हेकेखाेरपणामुळे अतिक्रमणाची व वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना अभय दिल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
साहित्याची केली ताेडफाेड
गांधी चाैक, इंदाैर गल्ली, कालाचबुतरा तसेच चाैपाटीवर अतिक्रमण उभारणाऱ्यांच्या हातगाड्यांची ताेडफाेड करण्यात आली. नाल्यांवर पक्के अतिक्रमण करीत त्यावर उभारलेले टिनाचे शेड, ओटे जमीनदाेस्त करण्यात आले. यावेळी गांधी राेडवरील आझाद काॅम्पलेक्सलगत काही व्यावसायिकांनी कारवाईला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता ताे मनपाने हाणून पाडला.
आयुक्त म्हणाल्या हाेत्या...
निमा अराेरा यांनी ४ फेब्रुवारी राेजी मनपाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने अतिक्रमण, माेकाट जनावरांची समस्या निकाली काढण्याचे स्पष्ट केले हाेते. शहरात फाेफावलेले अतिक्रमण आजही कायम असल्याचे चित्र आहे.