अकोला: सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी बोअर खोदण्याच्या नादात कान्हेरी ग्रामपंचायतकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० व्यासाची जलवाहिनी फुटण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. त्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला असून, मनपा प्रशासनाकडून कान्हेरी ग्रामपंचायत विरोधात पोलीस तक्रार केली जाणार असल्याची माहिती आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.महान धरणातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडी असे एकूण दोन प्लांट आहेत. ६५ एमएलडीच्या प्लांटवरून पाणी पुरवठा करण्यासाठी शहरापर्यंत ९०० व्यासाची तसेच २५ एमएलडी प्लांटवरून ६०० व्यासाची जलवाहिनी आहे. मंगळवारी सकाळी अकोला ते बार्शीटाकळी मार्गावरील कान्हेरी सरप ग्रामपंचायतच्यावतीने बोअर खोदण्यासाठी मुख्य रस्त्यालगतची जागा निश्चित करण्यात आली. त्या ठिकाणी बोअर खोदण्यास सुरुवात होताच जमिनीखालील ६०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याचा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी मनपाला माहिती होताच, जलप्रदाय विभागाने ६०० व्यासाच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद केला. सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात होते.दोन जलकुंभांचा पाणी पुरवठा खंडित२५ एमएलडीच्या प्लांटवरून जुने शहरातील शिव नगर व बसस्थानक परिसरामागील जलकुंभामार्फत शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे. उद्या बुधवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.मनपा प्रशासन करणार तक्रार!कान्हेरी ग्रामपंचायतकडून मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. या प्रकरणाची दखल घेत मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून कान्हेरी ग्रामपंचायत विरोधात पोलीस तक्रार केली जाण्याची दाट शक्यता आहे, तसेच दंडही आकारला जाणार आहे.