अकोला : ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित ठेवण्याची मागणी करीत अखील भारतीय माळी महासंघासह ओबीसी समाज बांधवांनी दि.२० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विविध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता.
राज्य सरकारने नुकत्याच मराठा समाजाच्या आंदोलकांना आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनामुळे ओबीसी प्रवर्गातील घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसी आरक्षण आबाधित ठेवावे, अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात ओबीसी समाज बांधवांनी दिला आहे. तसेच राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गात ४२५ जातींचा समावेश असून, केवळ १७ टक्के आरक्षण आहे. ओबीसींना अस्तित्वात असलेले आरक्षणच कमी पडत असल्याने त्वरित जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढविण्यात यावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. धरणे आंदोलनात अखिल भारतीय माळी महासंघ, बारा बलुतेदार संघ, सकल ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला होता.
आंदोलनात अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रकाश दाते, गणेश काळपांडे, माजी आमदार हरिदास भदे, डॉ. प्रकाश तायडे, श्रीकृष्ण बीडकर, मनोहर उगले, भारती शेंडे, संजय तडस, गणेश म्हैसने, नंदकिशोर बहादुरे, सुरेश कलोरे, साहेबराव पातोंड, उमेश मसने, नारायण चव्हाण, मोहन जाधव आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.