अकोला, दि. ८- वेतन आणि नवृत्ती वेतनाचे दायित्व महाराष्ट्र शासनाने स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीचे ५ मार्चपासून सुरू झालेले राज्यव्यापी आंदोलन तिसर्या दिवशीही सुरूच राहिले. दरम्यान, आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळावा म्हणून बुधवारी अकोल्यातील विभागीय आणि मंडळ कार्यालयास मजीप्राच्या कर्मचार्यांनी कुलूप लावले. मजीप्राच्या मागण्या न्यायिक असून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असा अभिप्राय अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी उपोषण मांडवास भेट देत नोंदविले. त्यांच्यासोबत अकोला पूर्वचे आमदार रणधिर सावरकर, किशोर मालोकार प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, वरिष्ठ स्तरावर उपोषणाबाबत चर्चा सुरू असल्याचे पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले. अकोला मजीप्राच्या कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात मजीप्राचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. सोळंके, सहायक अभियंता प्रशांत असणारे, मजीप्रा अभियंता संघटनेचे अकोला अध्यक्ष अजय मालोकार, सुरेंद्र कोपलवार, सुरेश हुंगे, विवेक सोळंके, अनूप खाजबागे, हरिदास ताठे, विनोद देशमुख, कर्मचारी संघटनेचे अनिल तायडे, अशोक खुमकर, दीपक नंदाने, सुभाष राठोड, गजानन मानकर, भगवान राठोडे, श्रीमती गावंडे, बिडकर आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांडगे, पदाधिकार्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून आंदोलनास यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. शुक्रवारी विश्रामगृहात बैठक मजीप्राच्या कर्मचार्यांवर गेल्या २४ वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांची बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात बोलाविली आहे. सकाळी दहा वाजता होऊ घातलेल्या या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
मजीप्रा कर्मचा-यांनी कार्यालयास लावले कुलूप!
By admin | Published: March 09, 2017 3:39 AM