अकोला : जिल्ह्यात पारस येथील औष्णिक वीज केंद्रात तयार होणार्या राखेवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी बाळापूर-पारस परिसरात १00-२00 एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी जिल्हाधिकार्यांना दिले. रविवारी सायंकाळी अकोल्याच्या शिवणी विमानतळावर गडकरी यांचे आगमन झाले. खामगावकडे प्रयाण करताना, अकोल्यातील आळशी प्लॉटस्थित वसंत खंडेलवाल यांच्या घरी भेट देऊन चहापान घेतले. यावेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, आ.हरीश पिंपळे, आमदार राजेंद्र पाटणी, महापौर उज्ज्वला देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, नगरसेवक विजय अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. जिल्ह्यात लघू उद्योग सुरू करण्यावर भर देत, या विषयावर गडकरी यांनी अधिकार्यांसोबत चर्चा केली. त्यामध्ये पारस येथील औष्णिक वीज केंद्रात तयार होणार्या राखेवर आधारित उद्योग सुरू होऊ शकतात, आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यानुषंगाने राखेर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी १00-२00 एकर जमीन उपलब्ध करण्याचे निर्देश गडकरी यांनी यावेळी जिल्हाधिकार्यांना दिले. राखेवर प्रक्रिया करून, खारपाणपट्टय़ातल्या जिल्ह्यातील जमिनीसाठी राखेचा उपयोग करता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
राखेवर उद्योग उभारणीसाठी जमीन उपलब्ध करा!
By admin | Published: January 04, 2016 2:43 AM