अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराचा आढावा घेत, प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामवली अद्ययावत करुन विविध संवर्गातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तातडीने तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्री राठोड यांनी मंगळवारी दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामाचा आढावा जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने बिंदुनामावली अद्ययावत करण्यासह शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी, दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करुन चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्री राठोड यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले. इयत्ता दहावी व बारावी परिक्षेसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती घेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी िदल्या. या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
४५५ शाळा दुरुस्तीच्या कामांची
यादी बांधकाम विभागाकडे पाठवा!
जिल्ह्यातील शाळा इमारती दुरुस्तीच्या कामांसाठी उपलब्ध निधीतून कामे करण्यासाठी ४५५ शाळांच्या इमारती दुरुस्ती कामांची यादी तातडीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या.