अकोला : खरीप हंगामात पेरणीकरिता महाबीजचे सोयाबीन बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महागडे बियाणे विकत घ्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे व खासगी कंपनीच्या बियाण्यांचे दर कमी करावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
महाबीज कंपनीच्या बियाण्यांची किंमत २२५० रुपये आहे; मात्र ते उपलब्ध नाही. इतर कंपनीचे बियाणे उपलब्ध असून, ते १२०० ते १५०० रुपये फरकाने कृषी सेवा केंद्रांवर विक्री होत आहे. सोयाबीन ३३५ जातीचे बियाणे उपलब्ध आहे. त्याच्या किमतीतही मोठा फरक आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मनात संभ्रम आहे. ज्याप्रमाणे रासायनिक खताचे भाव शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कमी झाले. तसेच बियाण्यांचे दरही कमी करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, विपूल माने, स्वप्निल थोरात, मुकुंद गुल्हाने, डिगंबर धुईकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.