अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव भुईगळ, भन्ते बी. संघपाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे,भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष यू.जी. बोराळे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. रहेमान खान, डॉ. सुरेश शेळके, सुजात आंबेडकर, वंदना वासनिक, अरुंधती सिरसाट आदी धम्मपीठावर उपस्थित होते.लोकशाही व्यवस्थेत ‘ईव्हीएम’ विरोधी लढ्यात सहभागी झाल्यास निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेसाठी ‘ईव्हीएम’ वापरासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे ‘ईव्हीएम’विरोधी लढयाचा संकल्प करण्याचे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी केले. एक परिवर्तन १९५० ला झाले असून, मानवतेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. मानवतेच्या या व्यवस्थेला सुरुंग लावण्याची आज देशातील परिस्थिती आहे, मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले. मताच्या अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार घालवू शकतो, मग या शस्त्राचा योग्य वापर आपण का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव अमीतभाई भुईगळ, प्रा. अंजली आंबेडकर, आ. बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, यू.जी. बोराळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, संध्या वाघोडे, रवींद्र दारोकार गुुरुजी यांनीही विचार मांडले. भन्ते बी. संघपाल यांनी सामूहिक त्रिशरण -पंचशील दिल्यानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव खंडारे, संचालन राजाभाऊ लबडे गुरुजी यांनी, तर आभारप्रदर्शन श्रावण ठोसर यांनी केले.