अकोला: गत काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्हय़ातील गावोगावी मलेरिया, डेंग्यू आजाराने अक्षरश: थैमान घातले आहे. ग्रामीण भागातून दररोज १0 ते १५ तापाचे रुग्ण खासगी रुग्णालयांसह सर्वोपचार रुग्णांलयामध्ये दाखल होत आहे. शरीरातील रक्तातील पेशी कमी झाल्याच्या, थंडी वाजून तापाच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात गत काही दिवसात जोमदार पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. वातावरण उष्ण व दमट झाले आहे. मोठय़ा प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया, डेंग्यू, डायरिया, गॅस्ट्रोसह अन्य साथीचे आजार पसरले आहेत. यासह सर्दी, ताप, टायफाइडसारख्या आजारांची साथसुद्धा पसरली असल्यामुळे सरकारी दवाखाने व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. सद्य:स्थितीत मलेरियाचे ८0 रुग्ण, डेंग्यूचे १८ रुग्ण सर्वोपचार व खासगी रुग्णालयांमध्ये भरती असल्याचे आकडेवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. तसेच डायरियाचे ३२ व टायफॉइडचे २७ च्यावर रुग्ण व इतर आजारांचे ३९ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. यात लहान मुले मलेरिया, डेंग्यूच्या आजाराला बळी पडत आहे. लहान मुलांमध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यावर त्यांनी दवाखान्यात भरती केल्यावर डॉक्टर रक्त व लघवीची तपासणी करायला सांगत आहे. तपासणी केल्यावर मुलांच्या रक्तातील पेशी कमी झाल्याचे आढळून येत आहेत.
गावोगावी मलेरिया, डेंग्यू आजाराचे थैमान!
By admin | Published: September 30, 2015 2:09 AM