अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान जिल्हाभरात डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, एक उपजिल्हा रुग्णालय, ४ ग्रामीण रुग्णालये अंतर्गत येत असलेल्या भागांमध्ये साचलेल्या पाण्यात, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सुरु आहे. सखल भागांमध्ये साचलेले पाणी, डबके, नाल्या ही डासोत्पत्तीची स्थाने आहेत. साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. अॅनोफिलीस जातीचा डास चावल्याने हिवताप होतो. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचेलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही. यासाठी हिवताप विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्व ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अभिनव भूते यांनी सांगितले.गप्पी माशांचे मोफत वितरणकिटकजन्य रोगास आळा घालण्याकरीता जैवीक पद्धतीने प्रतिरोध करण्याकरीता तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालये, ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शहरी स्तरावर नागरी आरोग्य केंद्र व जिल्हा हिवताप कार्यालय, अकोला या सर्व ठिकाणी गप्पी माशांचे मोफत वितरण करण्यात येत आहे.