संतोष येलकर अकोला, दि. ५- शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी रेल्वेस्थानकाजवळील मालधक्का कोणत्याही परिस्थितीत मार्च अखेरपर्यंत (मार्च एन्ड) हलविण्यात यावा, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा ह्यअल्टिीमेटमह्ण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी रेल्वे प्रशासनाला दिला.शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का परिसरातील रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. तसेच या परिसरात जड वाहने उभी केली जातात. त्यामुळे या भागातील रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. रेल्वेस्थानक भागातील या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक असल्याने, मालधक्का रस्त्यावरच जड वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे होणार्या वाहतुकीच्या कोंडीत या ठिकाणी अनेकदा अपघाताचे प्रसंग घडतात. या पृष्ठभूमीवर रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का शहराबाहेर हलविण्याचा आदेश गतवर्षी जिल्हाधिकार्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानंतर मालधक्का शहराबाहेर हलविण्याची मुदत गत ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकार्यांनी रेल्वे प्रशासनाला दिली होती; मात्र तरीही रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्का हलविण्यात आला नसल्याने, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी गुरुवारी रेल्वे आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकार्यांची बैठक घेतली. रेल्वेस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत येत्या ३१ मार्चपर्यंत मालधक्का सोयीनुसार शहराबाहेर हलविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रेल्वे प्रशासनाला या बैठकीत दिले. मार्च अखेरपर्यंंत मालधक्का हलविला नाही तर यासंदर्भात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा अल्टीमेटमही जिल्हाधिकार्यांनी दिला. या बैठकीला अकोला रेल्वेस्थानक प्रबंधक एम.के.पिल्ले, एम.बी. निकम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, स्थानिक गुन्हे शाखा तथा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे व ट्रान्सपोर्ट युनियन प्रतिनिधी शेख असलम, मुमताज खान उपस्थित होते.
मालधक्का हलवा; अन्यथा फौजदारी कारवाई
By admin | Published: January 06, 2017 2:44 AM