अकोला/ अकोलखेड, दि. २६- अकोट तालुक्यातील अकोलखेड शेतशिवारात मुक्त संचार करीत असलेल्या नर अस्वलास रविवार, २६ जून रोजी अकोला व अमरावती वन्यजीव विभागाच्या दक्षता विभागाने जेरबंद केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागालगत असलेल्या अकोलखेड ग्रामस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लगतच्या शेतशिवारात अस्वलाचा संचार असल्याची चर्चा होती; मात्र रविवारी सकाळी काही ग्रामस्थांनी त्यास पाटील यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहिले. मनात घर करून असलेल्या भीतीवर शिक्कामोर्तब झाल्याने, गावकर्यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना यासंदर्भात माहिती दिली. दुपारी २ वाजताच्या सुमारास अमरावतीच्या दक्षता विभागाने व अकोला-अकोट वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठले. प्रारंभी लगतच्या झुडुपात लपून बसलेल्या अस्वलास जेरबंद करताना पथकातील वन कर्मचार्यांना धावाधाव करावी लागली. अखेरीस बेशुद्धीच्या इंजेक्शनचा मारा करून त्यास पकडण्यात त्यांना यश आले. पकडण्यात आलेल्या ३.५ वर्षीय अस्वलास रात्री उशिरा मेळघाट अभयारण्यात परत सोडून देण्यात आले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अशोक व्यायाळ यांनी ह्यलोकमतह्णला दिली.
अकोलखेड येथे नर अस्वल जेरबंद!
By admin | Published: March 27, 2017 3:00 AM