तेल्हारा (अकोला): मालपुरा येथे रविवारी एका पोलिस शिपायासह चौघांची हत्या करणार्या आरोपींना पोलिसांनी बोलते केले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर सोमवारी कथन केला. हत्याकांडासाठी वापरण्यात आलेला ऑटोरिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे. मालपुरा येथे रविवार २८ जून रोजी शेतीच्या हिश्शासाठी बाबुराव चराटे (६0), धनराज चराटे (५५) शुभम धनराज चराटे (२२) व गौरव धनराज चराटे या चौघांची द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (४५), हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५0), श्याम हरिभाऊ तेलगोटे (२१) व हरिभाऊचा लहान मुलगा (१७) या चौघांनी विळा व रामपुरी चाकूने गळा चिरून हत्या केल्याची कबुली पोलीस कस्टडीमध्ये असणार्या द्वारकाबाई तेलगोटे व श्याम तेलगोटे या आरोपींनी दिली. ह्यशेतीचा हिस्सा देत नसल्याने त्यांना संपविले. या घटनेचे आम्हाला कुठलेही दु:ख नाही व पश्चात्तापही नाही,ह्ण असे त्यांनी तपासात सांगितले. घटनेच्या दिवशी आकोटच्या सिद्धार्थनगरातील आंबोळी वेस भागातील प्रशांत बळीराम तेलगोटे याच्या मालकीचा एमएच ३0 एएफ ८९६0 क्रमांकाचा ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन सदर आरोपी मालपुरा येथे आले. त्यावेळेस शुभम धनराज चर्हाटे हा गावातील एका ओट्यावर बसलेला आरोपींना दिसताच त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीतील विळा व रामपुरी काढून शुभमवर वार करून त्याला संपविले. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळविला असता त्यांना धनराज चर्हाटे व त्यांचा दुसरा मुलगा गौरव दिसून आला. आरोपींनी क्षणाचाही विलंब न करता जवळच्या शस्त्राने धनराजवर सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच गौरवलासुद्धा आरोपींनी संपविले. यानंतर आरोपींना बाबुराव चर्हाटे दिसून आले. डोक्यात सैतान शिरलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कुर्हाडीने वार केला. यावेळी त्यांनी जीव वाचविण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांचाही जीव घेतला. सदर घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले. या घटनेत वापरलेला ऑटोरिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपी हरिभाऊ राजाराम तेलगोटेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेतील आरोपींची पोलीस कसून चौकशी करीत असून, त्यांच्या बयानात कुठे तफावत आहे काय किंवा ते दिशाभूल करीत आहेत काय, याचा उलगडा करीत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मालपुरा हत्याकांडातील आरोपींनी दिली हत्येची कबुली
By admin | Published: July 01, 2015 1:42 AM