अकोला : माळी समाजाला राज्यकर्ती जमात बनविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण येथे राज्यव्यापी सर्वशाखीय माळी समाजाचा सत्तासंपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माळी समाज महामेळावा ट्रस्ट समितीचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सोमवारी येथे दिली.अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माळी समाजाला राज्यकर्ती जमात बनविणे, समाजाचा सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक व राजकीय विकास करणे, संत शिरोमणी सावता महाराज संजिवन समाधी तीर्थक्षेत्र ‘अरण’ ला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त करणे, सावता महाराज यांच्या नावाने वनऔषधी संशोधन केंद्राची निर्मिती करणे, संविधानाची जोपासना व आरक्षण संरक्षित करण्याच्या ध्येयासाठी माळी समाजाचा राज्यव्यापी सत्तासंपादन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असून, राज्यातील एक लाख माळी समाजबांधव सत्तासंपादन महामेळाव्यात सहभागी होणार असल्याचा दावा देखिल शंकरराव लिंगे यांनी केला. सत्तेत वाटा मिळविल्याशिवाय माळी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यानुषंगाने समाजाचे प्रबोधन करण्यासाठी सत्तासंपादन मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगीतले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, अॅड.संतोष रहाटे, बालमुकुंद भिरड, दिनकर वाघ, प्रभा शिरसाट, शोभा शेळके, डॉ.प्रसन्नजीत गवई, शेख साबीर उपस्थित होते.