अकोला: घरकुल, शौचालय योजनांचा लाभ मिळत नसल्याने आणि पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याच्या मुद्दय़ावर, शहरानजीकच्या मलकापूर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आवारात घागरी फोडून तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.शासनाच्या इंदिरा आवास, रमाई आवास योजनेंतर्गत अकोला शहराजवळील मलकापूर गावात दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांची प्रतीक्षा यादी योग्य प्रकारे तयार करण्यात आली नाही. दारिद्रय़रेषेखालील पात्र लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीतून वगळण्यात आले. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या कार्यक्रमात शौचालय बांधकामासाठी दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना अनुदान दिले जाते; परंतु ग्रामपंचायतमार्फत या योजनेची गावातील ग्रामस्थांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गावातील गरीब, अल्पसंख्याक नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच पाणीटंचाईच्या परिस्थितीत गावात पाणीपुरठय़ाचे नियोजन योग्य करण्यात आले नसल्याने, नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुद्दय़ांवर सरपंचांनी राजीनामा द्यावा व ग्रामसेवकास तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत, शुक्रवारी ग्रामस्थांनी मलकापूर ग्रामपंचायत आवारात घागरी फेडून संताप व्यक्त केला. त्यानंतर या प्रश्नावर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून, जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मलकापूरचे देवेश पातोडे, सूर्यभान मोरे, शांताराम गोपनारायण, डिगांबर गोपनारायण, अविनाश इंगोले, भारत बोरकर, विजय अवचार, उद्धव वाकोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मलकापूर ग्रामपंचायतीत फोडल्या घागरी
By admin | Published: February 27, 2016 1:40 AM