अकोला : संपत्तीच्या वादातून इन्कम टॅक्स चौकातील हरी रेस्टॉरंटसमोर असलेल्या पानपट्टी चालकाने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नेमके मुन्ना केशरवाणी यांनी स्वत: जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याविषयी उलटसुलट चर्चा होती. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.इन्कम टॅक्स चौकात मुन्ना ऊर्फ इंद्रजित प्रसाद केशरवाणी (५०) यांचा पानठेला आहे; मात्र काल अतिक्रमण विभागाने त्यांचा पानठेला हटवल्याने त्यांनी एक टेबल टाकून पानठेला सुरू केला होता. नेमकी याच कारणावरून ठिणगी उडाली आणि मुन्ना केशरवाणी व त्यांच्या नावेवाइकांत वाद झाला. अचानक गुरुवारी दुपारी मुन्ना केशरवाणी यांनी पेट घेतल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना विझवण्याचा प्रयत्न झाला. त्यात मुन्ना केशरवाणी हे ७२ टक्के भाजल्या गेले. मुन्ना केशरवाणी यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी त्यांचे बयान नोंदवल्याची माहिती आहे. या बयानामध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने रॉकेल टाकून जाळण्यात आले की आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, याची नेमकी माहिती बाहेर आली नाही. पोलीस तपासातच काय ते निष्पन्न होणार आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.
५0 वर्षीय इसमास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 1:30 PM