अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात भंडारा येथील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ही हत्या नात्यातीलच एका युवकाने केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू केली आहे.जुने शहरातील रहिवासी सागर चौधरी याने भंडारा येथील रहिवासी असलेल्या संतोष पांडुरंग ठाकरे (४५) यास गुरुवारी दुपारी रेल्वे स्टेशनवरून स्वत:च्या दुचाकीने जुने शहरात आणले. त्यानंतर या दोघांनी शहरात नास्ता व चहापाणी घेऊन सायंकाळच्या सुमारास हे दोघेही अन्नपूर्णा माता मंदिरामागील जंगलात बसले. या ठिकाणी दोघांमध्ये बराच वेळ वाद झाल्यानंतर सागर चौधरीने संतोष ठाकरे यांच्या पोटात पेचकच भोसकला. त्यानंतर लगेच परिसरातील दगड ठाकरेच्या डोक्यात घातला. दगडाने चार ते पाच वेळा ठाकरेंच्या तोंडावर आणि दगडावर हल्ला केल्याने यामध्ये ठाक रेचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्यासह जुने शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी संतोष ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक व्हॅनद्वारे घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे बोलल्या जात असून, पोलिसांनीही या अनैतिक संबंधाच्या कारणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर मृतक व आरोपींमध्ये नाते असल्याचीही माहिती समोर आली आहे. आठवड्यात दोन हत्याशहरात एका आठवड्यात दोन हत्याकांड घडले आहेत. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच लहान उमरीत एका युवकाची धुळवडीला हत्या करण्यात आली, तर लगेच एका आठवड्याच्या आतच भंडारा येथील इसमाची अकोल्यात हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून, निवडणूक कामासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रणासाठीही पोलिसांना काम करावे लागणार आहे.