अकोला : लग्नानंतर प्रियकरासोबत जाण्यास नकार देणाºया प्रेयसीच्या पतीला दहशतवादी ठरविण्याचा कट रचणाºया प्रियकराला मुंबई पोलिसांनी शुक्रवार, ७ जून रोजी बुलडाण्यातून अटक केली आहे. आरोपी प्रियकराने मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर शालीमार एक्स्प्रेसमध्ये चक्क बॉम्बसदृश वस्तूसह प्रेयसीच्या पतीचा मोबाइल क्रमांक असलेले धमकीचे पत्र ठेवल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुंबई टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार, मूळ बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द येथील रहिवासी एक तरुण हा सध्या मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास आहे. त्या ठिकाणी त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते; मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसºयाच तरुणासोबत लावून दिला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्या प्रियकराने प्रेयसीकडे पतीला सोडून सोबत राहण्याचा हट्ट धरला; परंतु प्रेयसीने त्याला नकार दिला. त्यामुळे त्याने अश्लील फोटो प्रेयसीच्या पतीला पाठविले; मात्र पत्नीची बदनामी नको म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. पत्नीनेही प्रियकरासोबत जाण्यास नकार दिल्याने पती तिच्या बाजूने ठाम उभा राहिला. प्रेयसीने नकार दिल्याने आरोपी अनंतने तिच्या पतीला दहशतवादी ठरविण्याचा कट रचला व नंतर प्रेयसीसोबत संसार थाटण्याचे स्वप्न रंगविले. कटाचे पूर्वनियोजन करीत प्रियकराने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बुधवारी शालीमार एक्स्प्रेसमध्ये फटाके, वायरपासून बॉम्बसदृश वस्तू तयार करून ठेवली. सोबतच प्रेयसीच्या पतीचा मोबाइल क्रमांक लिहिलेले धमकीचे पत्रही तेथे ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एक्स्प्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास केल्यावर हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील तरुणाचा असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने थेट बुलडाणा गाठून आरोपीला अटक केली. आरोपीला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती असून, या कारवाईला बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.अकोला ‘एटीएस’ने केली होती चौकशी!या प्रकरणात गुरुवारी अकोला ‘एटीएस’ने आरोपी अनंत वानखेडे याला गुरुवार, ६ जून रोजी बुलडाण्यातील नांदुरा खुर्द येथून अटक केली होती. चौकशीसाठी त्याला अकोल्यात आणले होते; परंतु अकोला एटीएसला हवी असलेली माहिती त्याच्याकडून न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती अकोला एटीएसने ‘लोकमत’ला दिली.मोबाइल क्रमांकावरून झाला उलगडा!प्रियकराने बॉम्बसदृश वस्तूसोबत ठेवलेल्या धमकीच्या पत्रावर पोलिसांना एक मोबाइल क्रमांक आढळला. पोलिसांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक पे्रयसीच्या पतीचा असल्याचे समोर आले. या आधारे घडलेला प्रकाराचा उलगडा झाला.