लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी महिला महानगर अध्यक्ष मंदा देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. मंदा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र समोर आले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका पार पडतील. त्यानुषंगाने प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय देशमुख यांना उमेदवारी नाकारल्यानंतर देशमुख यांनी असंख्य सर्मथकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसला भगदाड पाडले होते. राकाँच्यावतीने विधानसभा निवडणूक लढणार्या विजय देशमुख यांना लक्षणीय मते मिळाली होती. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राकाँच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ देशमुख यांच्या गळ्य़ात घातली. फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने महिला महानगराध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा एकदा मंदा देशमुख यांच्याकडे सोपवली. सर्व काही सुरळीत चालू असतानाच पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यादरम्यान अचानक अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ आता मंदा देशमुख यांनीसुद्धा पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या देशमुख?पक्षात नवीन आलेल्या लोकांची अरेरावीची भाषा आणि वागणूक माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अवघड जात होती. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या काम करणे कठीण झाले आहे. पक्षात चांगले काम करणार्या व सक्रिय महिलांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे मंदा देशमुख यांनी नमूद केले आहे.