लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आगामी गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी सकाळी आढावा बैठक घेतली़. गणेशोत्सव काळात भक्तांसाठी लागणाऱ्या सुविधा तथा कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी मंडळांची नोंदणी व अन्य परवानग्यांसाठी भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मनपात एक विशेष ‘खिडकी’ सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गणेश विसर्जन मिरवणूक, मिरवणुकीचा मार्ग, त्यासाठी लागणारा बंदोबस्त, याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली़ मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, एलईडी दिवे तथा सीसी कॅमेऱ्यांची निगराणी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीवर राहणार आहे़ गणेश स्थापनेच्या १० दिवस अगोदरच संबंधित मंडळांना परवानग्या घेणे सुलभ व्हावे म्हणून ही व्यवस्था अगोदरच करण्यात आली आहे़ या कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी लागणाऱ्या बंदोबस्ताबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला़ गणेशोत्सव आणि मिरवणुकीच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये, ज्या मार्गावरून मिरवणूक जाणार असेल, त्या मार्गावरील वाहतुकीची काय व्यवस्था राहील, आदींबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली़ या कालावधीत बहुतांश ठिकाणी बॅरिकेट्स लावून करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, मनपा आयुक्त अजय लहाने यांची उपस्थिती होती़ प्रशासनाच्या संबंधित असलेल्या मुद्यांबाबत आज आढावा घेतला. लवकरच गणेश उत्सव समिती यांच्यासोबत त्यांच्या सूचना व अडचणीसंदर्भात गणेश उत्सव समिती व मंडळे यांची पुन्हा बैठक घेऊन त्यामध्ये समोर येणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येतील.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री.
गणेश मंडळांच्या नोंदणीकरिता मनपात उघडणार ‘खिडकी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:22 AM