अकोला : किडनी तस्करी प्रकरणामध्ये प्रथमच यवतमाळ येथील डॉ. मंगला श्रोत्री व नागपूर येथील व्यापारी राजेंद्र वर्मा यांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले; मात्र वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. श्रोत्री व वर्मा या दोघांनीही किडनी खरेदी केली असून, त्यांना हव्या असलेल्या किडनीसाठी अकोल्यातील दोघांना वेठीस धरण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनी किडनी खरेदी केल्याची माहिती आहे.यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यवतमाळ येथील श्रोत्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मंगला श्रोत्री यांची किडनी निकामी झाल्याने त्यांनी किडनीचा शोध सुरू केला होता. त्यांना किडनी मिळावी, यासाठी सर्व नातेवाइकांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांचा अकोल्यातील देवेंद्र शिरसाट याच्याशी संपर्क झाला. देवेंद्र शिरसाटने सांगली जिल्ह्यातील रहिवासी शिवाजी कोळी याच्या माध्यमातून डॉ. श्रोत्री यांना किडनी देण्यासाठी अकोल्यातीलच संतोष गवळी या इसमास मजबूर केले. त्यानंतर गवळीची किडनी श्रीलंकेत काढण्यात आली. ही किडनी डॉ. श्रोत्री यांच्या शरीरात असल्याची माहिती आहे. नागपूर येथील व्यापारी राजेंद्र वर्मा यांच्यासाठी संतोष कोल्हटकर यांची किडनी काढण्यात आली होती. या दोघांनाही पाच लाख रु पयांचे आमिष देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ही रक्कम त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या गवळी व कोल्हटकर यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली आहे. डॉ. मंगला श्रोत्री व राजेंद्र वर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. डॉ. श्रोत्री, वर्मा यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. आणखी काही डॉक्टरांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मंगला श्रोत्री व नागपूरचा व्यापारी चौकशीसाठी ताब्यात
By admin | Published: December 30, 2015 2:09 AM