अकोला: नवजीवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाºया चोरट्यास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी सातवे यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवित दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.गुजरात येथील गांधीनगर रहिवासी कानराज पन्नूस्वामी हे त्यांच्या पत्नीसह १३ मे २०१५ रोजी अहमदाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते. त्यावेळी अकोला फलाट क्रमांक एकवर गाडी थांबली असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणाची तक्रार कानराज पन्नूस्वामी यांनी लोहमार्ग पोलिसांत दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपी शिवा नीळकंठ बोंद्रे याला अटक करण्यात आली होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीला दोन वर्षांची शिक्षा व ४० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त पाच महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.