वाशिम : जिल्ह्यातील मानोरा व मालेगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा सफाया झाला. सोमवारी लागलेल्या निकालात अनेक प्रस्थापितांना हादरे बसले. मानोरा व मालेगाव नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी १0 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर सोमवार, ११ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. मानोरा नगरपंचायतीत भारिप-बहुजन महासंघ व जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे सर्मथित गटाने एकूण १७ जागांपैकी ८ जागा पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. दुसरीकडे काँग्रेसला ४, शिवसेनेला २, भाजपला २, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तथापि, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. भारिप-बहुजन महासंघाला सत्तास्थापनेसाठी एका नगरसेवकाची गरज आहे. मालेगाव नगरपंचायतमध्ये एकूण १७ जागा असून, स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही. काँग्रेसला ४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा, भाजपला १ जागा, शिवसंग्रामला ४ जागा, शिवसेनेला ३ जागा मिळाल्या, तर एका जागेवर अपक्ष विजयी झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
मानोरा, मालेगाव नगरपंचायतींमध्ये त्रिशंकू कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 2:18 AM