जप्त साहित्य परत करा!
अकाेला : महापालिकेच्या विद्युत व अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले असून, यामध्ये फायबर ऑप्टीक केबल, विद्युत वायर, लघू व्यावसायिकांच्या हातगाड्या आदी साहित्याचा समावेश आहे. जप्त केलेले साहित्य मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असून, ते परत करण्याची मागणी लघू व्यावसायिकांनी केली आहे.
पार्किंगसाठी जागा द्या!
अकाेला : शहरात नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागते. वाहनचालकांना त्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत असल्याने मनपाने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बुधवारी दिनेश काटे यांनी मनपाकडे केली.
स्वच्छतागृहांमध्ये सुविधाच नाहीत!
अकाेला : महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.
मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्यालयांत कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.
क्षयराेग विभाग वाऱ्यावर
अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारीत मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. या ठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची गरज आहे.
सिव्हिल लाइन रस्ता ठरताेय जीवघेणा
अकाेला : शहरातील वर्दळीचा असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहिन ठरला असून उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
उड्डाणपुलामुळे रस्त्यावर खड्डे
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे.
बेघर नागरिकांकडे मनपाचे दुर्लक्ष
अकाेला : शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजिनक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. या ठिकाणी बेघर नागरिक जेवण तयार करतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत आहे. या बेघर नागरिकांकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.