चाैकशीसाठी तीन वेळा समितीचे गठण
सत्तापक्षाच्या नगरसेवकांनी शौचालय घोळाच्या चौकशीची मागणी लावून धरल्यानंतर प्रशासनाने जानेवारी २०१८ मध्ये तत्कालीन उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले होते. अहवालात स्वच्छता विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षकांच्या बयाणाची नोंद असून, त्यांनी ‘जिओ टॅगिंग’ केले नसल्याचे नमूद आहे. त्यानंतर तत्कालीन आयुक्त कापडणीस यांनी तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्यांदा चाैकशी समिती गठित केली हाेती. सभागृहात सादर केलेल्या अहवालात दाेषींची पाठराखण करण्यात आल्याचा आक्षेप घेत सदर अहवाल नगरसेवकांनी फेटाळून लावल्यावर संजय कापडणीस यांनी प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्यांदा चाैकशी समितीचे गठण केले हाेते.
आयुक्त अराेरा साेक्षमाेक्ष लावणार का?
जुन्या शाैचालयांना रंगरंगाेटी करून त्या बदल्यात केंद्र व राज्य शासनाच्या काेट्यवधी रुपयांच्या निधीवर ताव मारण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतरही प्रशासनाच्या स्तरावरून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. एकीकडे लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या साहित्याची ताेडफाेड केली जात असताना दुसरीकडे काेट्यवधींचा निधी घशात घालणाऱ्या कर्मचारी, कंत्राटदारांविराेधात मनपा आयुक्त निमा अराेरा कारवाई करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.