पूर्व झाेनचा आवाका माेठा तरीही...
शहरात पूर्व झाेनचा आवाका माेठा असून याच झाेनमध्ये प्रभावी लाेकप्रतिनिधी, राजकारणी, डाॅक्टर, बडे उद्याेजक, व्यापाऱ्यांचा भरणा असल्यामुळे पूर्व झाेनची जबाबदारी सांभाळणारे अधिकारी कायम तणावात दिसून येतात. एकीकडे मालमत्ताकराची १०० काेटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी टॅक्स विभाग जंगजंग पछाडत असताना करअधीक्षक विजय पारतवार यांच्याकडे पूर्व झाेनची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कर अधीक्षक पारतवार यांची आगामी काळात कसाेटी लागणार आहे.
नगररचनाची गाडी रुळांवर आणणार ?
मागील काही महिन्यांपासून प्रभावी राजकारणी व मनपा पदाधिकाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब ध्यानात घेता नगररचनाची गाडी रुळांवर आणण्याच्या उद्देशातून आयुक्त निमा अराेरा यांनी मालमत्ता विभागाचे अधीक्षक संदीप गावंडे यांची या विभागात नियुक्ती केली आहे.