भरतिया रुग्णालयात २०३ स्वॅब
अकाेला: काेरोनाच्या पार्श्वभुमिवर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाव्दारे टिळक रोडवरील मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात २०३ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. सदर स्वॅब आरटीपीसीआर चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
उघड्यावरील मांस विक्री बंद करा!
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांलगत उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. मांस विक्री करण्यापूर्वी मनपाच्या आराेग्य अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करणे भाग आहे. बर्ड फ्लूचा प्रसार पाहता नागरिकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे उघड्यावरील मांस विक्री बंद करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
अकाेटफैल चाैकात नाला तुंबला
अकाेला: मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुंडूब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाइ करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खड्डयामुळे अपघाताची शक्यता
अकाेला: डाबकी राेडवरील शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकपर्र्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. यावेळी श्रीवास्तव चाैकाच्या बाजूला खाेदण्यात आलेला खड्डा जैसे थे असल्यामुळे दुचाकीचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. याप्रकाराकडे मनपा प्रशासन व प्रभागातील नगरसेवकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
मनपाचे आराेग्य निरीक्षक सुस्तावले
अकाेला: शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाइच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाइ कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
पथदिवे सुरु करा!
अकाेला: प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये व वाकापूर रस्त्यालगत अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून ही समस्या दुर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
सांडपाणी तुंबले;नागरिक त्रस्त
अकाेला: प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गंगा नगर व कायनात परिसरात नाल्यांची साफसफाइ हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून प्रभागातील नगरसेवक फिरकूनही पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.
जनजागृतीसाठी मनपा सरसावली
अकाेला: मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रार्दूभाव पाहता जनजागृतीसाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र आहे. चाचणीदरम्यान पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी सुध्दा साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.