मनात विचारांची गर्दी झाली की, त्याला लेखणीच्या रूपाने शब्दबद्ध करून कागदावर उतरविल्यावर ती रसिकांच्या हृदयापर्यंत पाेहाेचते. रसिकांना आनंदासाेबतच ती प्रबाेधन करीत असते. संस्काररूपी विचारांची शिदाेरी त्यातून मिळते. संत-महापुरुषांच्या विचारांचा स्पर्श त्या कवितेला असल्यामुळे रसिकांना ती विचार करायला भाग पाडते. अशाच कविता कवयित्री मालती पंजाबराव चांदूरकर यांच्या आहेत. त्यांचा ‘चार वेचलेले क्षण’ हा काव्यसंग्रह रसिकांना नवा दृष्टिकाेन देणारा आहे. सकारात्मक विचारांची पेरणी या काव्यसंग्रहात करण्यात आली आहे. ताेच विचार रसिकांना नव्या विश्वात घेऊन जाताे. अनेक कविता प्रेरणादायी ठरल्या आहेत. जीवनाचा दृष्टान्त सांगणारे श्री चक्रधरस्वामी, सेवाभाव जपणारे संत गाडगेबाबा, उन्नतीचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या विचारांचा झराच मालती चांदूरकर यांच्या कवितांमध्ये आहे. लीळा चरित्रातील दृष्टान्ताप्रमाणे प्रत्येक कवितेत नवा दृष्टिकाेन दडलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासातील क्षण काळजात साठवून ठेवले जातात. त्या क्षणांना निर्झराची उपमा देऊन त्याचे वर्णन करताना त्या म्हणतात,
गंगेवरी पवित्र चंद्रापरी शीतल,
आकाशी घेई गरुडझेप,
धीरगंभीर शांत वाहणारा,
विचारांचा ताे एक सुंदर प्रवाह हाेता...
मानवाने अतिरेक करून पर्यावरणाची फार माेठी हानी केली आहे. प्रदूषणाच्या विळख्यातून वसुंधरेची सुटका व्हावी, अशी आर्त हाक कवयित्रीने ‘पर्यावरण व वसुंधरा’ कवितेतून दिली आहे.
वृक्ष वेली लता वस्त्रे माझी सारी
नका चालवू त्यावरी शस्त्र भारी
निसर्गातील, वसुंधरेच्या सर्व किमया त्यांनी फुलपाखरू, क्षितिज, इंद्रधनुष्य, काजवा, माेगरा, पक्षी, पाऊस, भाग्य फुलांचे, चंद्रपाैर्णिमा, वृक्षाराेपण, फुलराणी या कवितेतून मांडल्या आहेत.
आयुष्यात नाती जपताना महिलांना माेठी कसरत करावी लागते. त्याबद्दलचे भावविश्व कवयित्रीने कवितांमधून मांडले आहे. ‘मंथन’ कवितेत त्या म्हणतात,
तुझ्या मनी किती असेल आठवणी
परंतु त्या न उकलाव्या जनी
तू साेबत केली, गाथा दु:खाची
कवयित्रीचे बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे ग्रामीण जनमाणसाचे यथार्थ चित्रण त्यांच्या कवितेतून उमटते. त्यांचे आजाेबा स्व. नथ्थूजी काेठेकर हे ब्रिटिशकालीन मुख्याध्यापक हाेते. त्यांच्या शिस्त, संस्कारांमुळे त्यांच्या जीवनाला दिशा मिळाल्याचे त्या मान्य करतात. बालपणापासून त्यांना पशुपक्ष्यांविषयी आदर आहे, त्यांच्याशी चार क्षण हितगुज करून त्यांचेही भावविश्व त्यांनी कवितेतून रेखाटले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण हाेताना त्यांनी वेचलेले चार क्षण ओव्यांच्या स्वरूपात काव्यसंग्रहात शब्दबद्ध केले आहेत.
कवयित्रीने परदेशात प्रवासादरम्यान आलेले अनुभवही कवितेतून टिपले आहेत. समाजात वाढलेला हिंसाचार, अपप्रवृत्ती पाहून त्यांचे मन व्यथित हाेते. क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले, महात्मा जाेतिबा फुले यांच्या कार्याचा दाखला देत त्यांनी त्यांच्या कवितेतून दुर्मीळ आशावाद मांडला आहे. त्यांनी आजच्या शिक्षणावर, नैतिकतेवर, भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे.
साक्षरतेचा हाेणार नाही भंग
अनेक सावित्री घेतील जन्म
शिक्षणाचा सदुपयाेग करून नवनव्या विचारांचा संकल्प करावा. त्यातून समाजाला नवी दिशा मिळेल, असे कार्य करावे. हाच विचार त्यांच्या कवितांमधून उमटताना दिसताे. संत-महंतांची शिकवण पदाेपदी जीवनात कामी येते, याचा प्रत्ययही त्यांनी सांगितला आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांचे मन व्यथित हाेते. कष्टकऱ्यांच्या वाट्याला दु:खाचे क्षण येऊ नयेत, असे त्यांना मनाेमन वाटते. म्हणून त्या कवितेत म्हणतात,
हाेईल माेल तुझ्या घामाचे
जगण्याची आस तू साेडू नकाे
मनाच्या भाववस्थेवर बहिणाबाई चाैधरींनी कवितांमधून मार्मिक भाष्य केले आहे. त्यांच्या विचारांचा वारसा मालती चांदूरकर यांनी जपला असून, त्यांनी मानवी मनाच्या भाववस्था कवितेत टिपल्या आहेत.
संकल्प साेडावा नवनिर्मितीचा
मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासाचा
साेडावा संकल्प पांचालीसारखा
व्हावी पूर्तता ऋषीमुनीसारखी
कवयित्री मालती चांदूरकर यांनी त्यांचा ‘वेचलेले चार क्षण’ हा काव्यसंग्रह त्यांचे पती श्री. पंजाबराव बाजीराव चांदूरकर यांना समर्पित केला आहे. तसेच या काव्यसंग्रहाला पुणे येथील साहित्यिक, शैक्षणिक समुपदेशक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे सहायक आयुक्त अनिल गुंजाळ यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. तसेच महंत वैद्यराज यक्षदेव उपाख्य, प्राचार्य धनंजय वर्मा, श्री दत्तमंदिर संस्थान, वाठाेड शुक्लेश्वर, जि. अमरावती यांचा आर्शीवादरूपी अभिप्राय लाभला आहे.