अकोला : येथील मनूताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी संशोधन करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे पेरणी यंत्र तयार केले असून, हे पेरणी यंत्र आंतरराष्ट्रीय फोर्स फॉर चेंजच्या पहिल्या रोबोटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. या विद्यार्थिनींनी उपांत्य फेरीत दोन पारितोषिके पटकावली.
त्यांचा प्रकल्प पहिल्या २० मध्ये असून, २५ ते ३० जूनदरम्यान अंतिम फेरी होईल. त्यासाठी त्यांना ग्लोबल इनोव्हेशन अवाॅर्ड मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२० मध्ये भारतातून प्रथम आलेल्या मनूताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनी ९ एप्रिल २०२१ रोजी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी झाल्या. त्यांनी केलेला अभिनव प्रकल्प सादर केला. या मुलींनी दुसऱ्यांदा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त धान्य पेरणी यंत्र तयार केले. कमी खर्चात, कमी मेहनत लागणारे, इंधन न लागणारे व सर्व प्रकारच्या बियाण्यांची लागवड करणारे पेरणी यंत्र तयार केले आहे. पेरणी यंत्राच्या माध्यमातून किती बियाण्यांची लागवड केली, बियाण्यांची लागवड झाली की नाही, झाली नसल्यास यंत्रातून बीप असा आवाज येईल. या प्रकल्पासाठी १८ विद्यार्थिनींनी मेहनत घेऊन स्वत: पेरणी यंत्र तयार केले. त्यासाठी त्यांना रोबोटिक्सच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक काजल राजवैद्य, विजय भट्टड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल माजी मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक, मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर यांनी कौतुक केले.
या मुलींचा प्रकल्पात सहभाग
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व अमेरिकेतील स्पर्धेत अंतिम फेरीत पेरणी यंत्र तयार करण्यासाठी इयत्ता दहावीतील गायत्री दिलीप तावरे, स्नेहल संदीप गवई, रुचिका शिवाजी मुंडाले, निकिता सुभाष वसतकार, प्रणाली चंद्रमोहन इंगळे, नेहा रामभाऊ कवळकार, सायली नितीन वाकोडे, स्वाती गजानन सरदार, अर्पिता रमेश लंगोटे, आदींनी, नववीतील सानिका विजय काळे, आंचल संतोष दाभाडे, गौरी ज्ञानेश्वर झांबरे, अंकिता विनोद वजिरे, पूजा महावीर फुरसुले, गौरी श्रावण गायकवाड, प्रांजली सदाशिव, दिया दाभाडे यांनी परिश्रम घेतले.