अकोला: कोविड लसीकरण माेहीम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांची नावे कोविन ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यानुसार, यादीत समाविष्ट सर्वांनाच कोविड लसीकरण केले जात आहे, मात्र जिल्ह्यातील अनेक कोविड योद्ध्यांसह कंत्राटी तत्त्वावर कार्यरत काही स्वच्छता कर्मचाऱ्यांची नोंद यादीत करण्यात आलीच नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाला, तेव्हा डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धाेक्यात टाकून रुग्णसेवा दिली. कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पहिल्या टप्प्यातच लस मिळावी या अनुषंगाने शासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार, कोविन ॲपमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. १६ जानेवारीपासून सर्वत्र कोविड लसीकरणाच्या माेहिमेला सुरुवात झाली, मात्र लसीकरण लाभार्थींच्या यादीत अनेक कोविड योद्ध्यांचा समावेशच नसल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टरांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोविड योद्ध्याच्या मते त्यांनी कोविड काळात स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून कोविड रुग्णांची सेवा केली. परंतु, लसीकरणाची वेळ आल्यावर यादीत नाव नसल्याने त्यांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे.
अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संपर्कच नाही
कोविड काळात आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात यातील अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. परंतु, लसीकरण यादी तयार करताना यातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोविड लसीपासून वंचित राहावे लागत आहे.
आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रत्येक काेविड योद्ध्यांची नोंद करण्यात येत आहे. कोविन ॲपमध्ये ज्यांचे नावे दिले, त्यांना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात अनेकांशी संपर्क करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला