सचिन राऊत /अकोलाजिल्हय़ातील दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांना १ मार्चपासून पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हेल्मेट सक्ती केली; मात्र अकोला पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचार्यांनी या हेल्मेट सक्तीला ठेंगा दाखविल्याचे मंगळवारी दिसून आले. प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचेच दुचाकीवर फिरत असल्याचे पहिल्याच दिवशी निदर्शनास आले.राज्यातील सर्वच जिल्हय़ात दुचाकीवर फिरणार्या दोघांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक शहरांमध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात आली असून, अकोला शहरातही दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यापूर्वी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हेल्मेट घालून असणे व नियमांचे पालन करताना दिसले पाहिजेत, असे आदेश पोलीस अधीक्षक मीणा यांनी दिले होते. १ मार्चपासून प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकीवर हेल्मेट घालूनच फिरेल, असे स्पष्ट करण्यात आले; मात्र मंगळवार, १ मार्च रोजी प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचेच फिरताना दिसले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांसह महिला पोलीस कर्मचारी हेल्मेट सक्ती असतानाही विना हेल्मेटचेच फिरत होते. पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी दुचाकीवर फिरताना हेल्मेट सक्तीला स्पष्ट ठेंगा दाखविल्याचे यावरून स्पष्ट झाले. पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती करताना पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना तब्बल एक महिन्याचा कालावधी दिला; मात्र त्यानंतरही पोलीस अधीक्षकांच्या आदेशाकडे अधिकारी व कर्मचार्यांनी पहिल्याच दिवशी कानाडोळा केल्याचे वास्तव आहे.हेल्मेट न वापरणार्या ११ पोलिसांवर कारवाईशहरात विना हेल्मेट फिरणार्या पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक मीणा व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात एक पथक कार्यरत होते. या पथकाने ११ पोलीस कर्मचार्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. हेल्मेट न घालणार्या प्रत्येक पोलीस कर्मचार्याला प्रत्येकी १00 रुपये दंड आकारण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतल्यानंतर सर्वच ठाणेदारांनी कर्मचार्यांना बुधवारपासून हेल्मेट घालूनच पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत.सवलतीच्या दरातील हेल्मेटचा तुटवडापोलीस अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये सवलतीच्या दरात हेल्मेट उपलब्ध करण्यात आले आहेत; मात्र पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची मागणी जास्त आणि हेल्मेटचा पुरवठा कमी असल्याने अनेक पोलिसांना हेल्मेटच मिळाले नाहीत. त्यामुळेही अनेक पोलीस कर्मचारी विना हेल्मेटचे रस्त्यावर फिरत असल्याची माहिती आहे. पोलीस कर्मचार्यांसाठी ४४ टक्के सवलत दरात उपलब्ध करून देण्यात आलेले हेल्मेट खरेदी करण्यासाठी पोलीस मुख्यालयात मंगळवारी सायंकाळपासून चांगलीच गर्दी झाली होती.
हेल्मेटसक्तीला अनेक पोलिसांचा ठेंगा!
By admin | Published: March 02, 2016 2:46 AM