अकोला : मंगळवारी कामयानी एक्स्प्रेसला इटारसीजवळ झालेल्या अपघातानंतर अनेक गाड्या अकोला मार्गे वळविण्यात आल्या आहेत. इटारसीमार्गे नागपूरवरून भुसावळकडे आणि भुसावळवरून नागपूरकडे जाणार्या गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत २५ पेक्षा अधिक गाड्या अकोला मार्गे धावल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली. भोपाळ मंडळातील हरदा या रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी कामयानी एक्स्प्रेसला अपघात घडला. अपघाताची भीषणता अधिक असल्याने इटारसीमार्गे अप आणि डाऊन लाइन पूर्णत: ठप्प झाली आहे. इटारसीमार्गे भुसावळवरून नागपूरकडे जाणार्या, तसेच नागपूरवरून भुसावळकडे जाणार्या बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून, बुधवारी सायंकाळपर्यंंत ५१२६, २१८८, १६५५, २१४९, ३२0२, १0१५, १४0७, १0५७, २१६७ याव्यतिरिक्त २५ पेक्षा अधिक गाड्या अकोला मार्गे धावल्या. मार्गपरिवर्तन करण्यात आलेल्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुविधेकरिता अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ वर विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून, बुधवारी स्थानिक यंत्रणा कसोशीने कामाला लागली असल्याचे दिसून आले. पश्चिम मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने येत्या काळात अनेक गाड्या अकोलामार्गे वळविण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक अधिकार्यांनी 'लोकमत' ला दिली.
अनेक गाड्या वळविल्या अकोलामार्गे
By admin | Published: August 06, 2015 1:15 AM