अकोला : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ३४७१ पैकी २९१२ शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ५०० शिक्षकांचे मॅपिंग तातडीने करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी शिक्षण विभागाला दिले. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात बदली प्रक्रियेसंदर्भात चर्चेसाठी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे मॅपिंग करणे, गुगल मॅपिंगचे अंतर ग्राह्य धरण्यात येईल, असेही सांगण्यात आले.गेल्या वर्षी रॅण्डम राऊंडमध्ये दूर अंतरावर दिलेल्या शिक्षकांना समूपदेशनाने रिक्त जागी पदस्थापना दिली जाईल. २०१९ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती कार्यवाही केली जाईल. मुख्याध्यापकांना लेखाविषयक प्रशिक्षण देणे, कर्तव्यावर हजर नसणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई करणे, या विषयावर चर्चा झाली. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या व बदली प्रक्रियेतील बाबींवर मत व्यक्त केले. बैठकीत उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, संतोष पाटील, राजेंद्र भटकर, सुनील जानोरकर, शहाणे, खडसे शिक्षण विभागाचे कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.