चिखली, दि. २३- मराठा आणि दलित यांचे व्यावहारिक संबंध परंपरागत आहेत. यांच्यातील भांडण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. हे भांडण महिनाभर अधिक वर्षभरा पुरते असते. तद्नंतर त्यांच्यात परस्परांवर अवलंबून असल्याने सलोखा निर्माण होतो; परंतु मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने निर्माण होत असलेली दरी मोठी आहे. त्याचबरोबर गंभीरदेखील. या दरीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून गैरविश्वास वाढीस लागला आहे. याला सरकारची बोटचेपी भूमिका कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.स्थानिक मौनीबाबा संस्थानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसेनजित पाटील, अशोकराव सोनुने, शरद वसतकार, अँड.राहुल धुरंधर, विनोद कळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अँट्रॉसिटी कायद्यासंदर्भात बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले, की अँट्रॉसिटीचा दुरुपयोग मराठय़ांकडूनच होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. याचा बोध घेऊन मराठय़ांनी त्याचा गैरवापर थांबविणे गरजेचे आहे. यासोबतच मराठा आणि मुस्लीम या दोन्ही समाजाला आरक्षणाची गरजच नाही. या दोन्ही समाजाच्या समस्या वेगळय़ा आहेत. मुस्लिमांनी आपल्याला शिक्षण कुठल्या माध्यमातून घ्यायचे, उर्दू, मराठी, इंग्रजी की मदरशातून की शाळा, कॉलेजातून हे अगोदर ठरविले पाहिजे. जर मदरशातून घ्यायचे असेल तर त्यांना आरक्षण देऊन उ पयोग काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. मराठा समाजातील घरणेशाही सं पुष्टात आणून सर्वसामान्य गरीब मराठय़ांच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने त्या घराणेशाहीच्या विरोधातील असंतोषदेखील उफाळून आल्याचे दिसून आले. घराणेशाही गाडली तरच पुरोगामीत्व टिकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरक्षण हा विकासाचा मुद्या नाही. आरक्षण मागणे हा लोकशाहीचा एक भाग असला, तरी हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे आपण मानतो. मराठा मूक मोर्चाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या ङ्म्रीमंत मराठय़ांबाबत गरीब मराठय़ांनी विचार केला पाहिजे, की हे लोक आपले विडंबन तर करीत नाहीत ना. हे विडंबन गरीब मराठय़ांनीच थांबविले पाहिजे. मराठा मूक मोर्चासंदर्भात शासन ठोस भूमिका घेत असल्याचे दिसून येत नाही. या सरकारचा कारभार कुठे चाललाय? हा देखील मोठ प्रश्न आहे. या सरकारचं काय चाललयं, हे फक्त संघ आणि सरकार या दोहोंनाच ठाऊक असल्याची पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.
मराठा व ओबीसीमधील वाढती दरी गंभीर!
By admin | Published: October 24, 2016 2:48 AM