ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २४ - मराठा क्रांती मोर्चा हा कुठल्याही जातीच्या, धर्माच्या विरोधात नाही. आता ‘आरक्षण’ हा एकच निर्धार घेऊन मराठा एकवटला आहे. कोपर्डी येथील घटनेचा निषेध तसेच अॅट्रासिटी कायद्यात बदल हवा आहे, वाशिमातील मोर्चा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने निघणार असून, त्यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून शिस्तबध्द पध्दतीने हा मोर्चा निघणार असल्याचे जय्यत तयारीवरुन दिसत आहे. मालेगाव येथे मोर्चा निमित्त २४ सप्टेंबर रोजी भव्य रॅली काढण्यात आली होती.
विशेष म्हणजे मोर्चा दरम्यान कोणालाही अडथळा होवू नये याकरिता मोर्चा दरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजुंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्वठिकाणी पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
मोर्चासाठी २० हजार फलक, २० हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २० रुग्णवाहिका, १० महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २० लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनीप्रेक्षक, १० स्क्रिन असून मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.