अकाेला : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जिल्हाभरातून निकालाच्या अनुषंगाने राजकीय कुलगीतुरा रंगला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते या निकालाने व्यथित झाले आहेत. ५८ क्रांती माेर्चे, तरुणांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही, अशी चिंता सामाजिक कार्यकर्त्यांना लागली असून, त्यांनी अधिक आक्रमकतेने लढाईचा संकल्प केला आहे. दुसरीकडे याच मुद्यावरून राजकीय आराेप- प्रत्यारोप हाेत आहेत. भाजपाने या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या महाविकास आघाडीला घेरले असून, महाविकास आघाडीने केंद्र सरकारवर बाेट ठेवले आहे.
काेट
-मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारला पूर्ण अयशस्वी ठरले आहे. मराठा समाजात या निर्णयामुळे एक प्रकारचा आक्रोश असंतोष फसवणुकीची भावना निर्माण झाला आहे व त्यास फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे. आजचा निकाल हा महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सतत होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम आहे.
-संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री
...........
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अपयश अधाेरेखित झाले आहे. केंद्राने सक्षमपणे पुढाकार घेऊन आरक्षणाची बाजू न्यायालयात भक्कम मांडायला हवी हाेती. केवळ राज्य सरकारवर दाेषाराेप करून या मुद्याचे राजकारण हाेऊ नये, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
-नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना