अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून मराठा आरक्षण देण्याची मागणी केली.मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे. गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनाने पेट घेतल्याचे दिसून आले. २५ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचे चित्र होते. बंददरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, मंत्री, आमदार यांच्याकडे वळविला आहे. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे. त्या धर्तीवर लोकप्रतिनिधींना झोपेतून जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक व कार्यकर्त्यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार (अकोला पूर्व)रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळी झोपमोड आंदोलन केले.