अकोला -आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन तिव्र होत आहे मात्र या आंदोलनाला सत्ताधारी मराठेच जबाबदार आहेत. यापूर्वी जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यत सत्तेची सर्वाधीक पदे मराठा समजाकडे होती, मराठा समाज आरक्षणाची मागणी ही जुनीची मागणी आहे. साधारणपणे १९८१ पासून या मागणीची सुरवात झाली तेव्हांपासून सत्तेत असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी यामागणीकडे दूर्लक्ष केले. त्या मराठा नेत्यांची आरक्षणासोबतच बांधीलकीच नव्हती असा आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. राजकीयदृष्टयाही मागणी केली जात असली तरी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी आधी संविधानात बदल करावे लागतील. आर्थिक निकषांची सध्याच्या संविधानामध्ये राज्यघटनेत तरतुदच नाही त्यामुळे संविधान बदलााशिवाय ते शक्य नाही असेही त्यांनी सांगीतले.