अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत गंभीर होत असून, मार्च महिन्यात अकोला काेरोनाचा हॉटस्पॉट ठरला. महिन्यातील ३१ दिवसांत जिल्ह्यात पहिल्यांदाच ११ हजार ५५५ पॉझिटिव्ह रुग्ण, तर ८६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट ठाण मांडून आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. मार्च महिन्यातील स्थिती पाहता प्रतिदिवस सरासरी ३७० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटांची कमतरता भासत असून खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचीही टंचाई दिसून येत आहे. शिवाय खासगीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांची धाव ही सर्वोपचार रुग्णालयाकडे आहे. परिणामी आरोग्यसेवेवर ताण येत आहे. कोविड फैलावाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खाटा, ऑक्सिजन आणि इतर साधनसामग्रीची टंचाई भासून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संसर्ग रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मार्च महिन्यात
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. मार्च महिन्यात ८६ जणांना कोविडमुळे जीव गमवावा लागला असून, ही परिस्थिती आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येते.
असा आहे कोरोनाचा आलेख
महिना- रुग्ण - मृत्यू
एप्रिल - २८ - ०३
मे - ५५३ - २९
जून - ९६९ - ४७
जुलै - १०८७ - ३४
ऑगस्ट - १४०० - ४७
सप्टेंबर - ३४६८ - ८४
ऑक्टोबर - ८९३ - ४५
नोव्हेंबर - १०३३ - १२
डिसेंबर - १०५८ - २९
जानेवारी - ११३५ - १४
फेब्रुवारी - ४५२७ - ३१
मार्च - ११५५५ - ८६