अकोला : पश्चिम विदर्भात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गत काही वर्षांमध्ये या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाने खाणाऱ्या अळी पिके फस्त करीत आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने झेंडूच्या पानावर संशोधन केले असून, या झेंडू पानांच्या अर्कामुळे पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्यांचे प्रभावी व्यवस्थापन होणार आहे.
मागील काही वर्षांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यंदाही सोयाबीनला विक्रमी दर मिळाल्याने पश्चिम विदर्भात पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे; मात्र या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. सोयाबीन पिकावर उंट अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर उपाय म्हणून दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात महागडी रासायनिक कीटकनाशके फवारतात; मात्र हे कीटकनाशक शेतकऱ्यांसह मानवी आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने यावर संशोधन करून प्रभावी झेंडू अर्क तयार केले आहे. या अर्काची शिफारस करण्यात आली असून, हे फवारणी केल्यास पाने खाणाऱ्या अळ्यांचे योग्य व्यवस्थापन करता येणार आहे. यामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.
वनस्पतीशास्त्रविषयक असल्यामुळे झेंडू अर्क किडींच्या नुकसानीपासून रोखते. यामुळे कीड मरत नाही; पण पिकांवर उपजीविका करणार नाही. नवीन अळ्या सदृढ राहत नाही. पिकावरील अळ्यांचे व्यवस्थापन होते.
- डॉ. डी.बी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग
सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्यांच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता तसेच अधिक उत्पादनासोबत जास्तीत जास्त आर्थिक मिळकतीसाठी निंबोळी अर्क किंवा झेंडू अर्क प्रभावी आहे.
- यू.एस. कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक, डॉ. पंदेकृवि अकोला
द्रावण असे करा तयार
झेंडू सावलीत सुकवून चुरा करून ठेवावा. फवारणीच्या आधीच्या दिवशी दहा लिटर पाण्यात पाच किलो झेंडूच्या पानांचा चुरा भिजत घालावा, उरलेल्या पाण्यात एवढे पाणी टाका की ते द्रावण १०० लिटर भरले पाहिजे. यामध्ये १० लिटरला २ टक्के साबणाचा चुरा किंवा डिटर्जंट पावडर मिक्स करून घ्यावे.
फवारणीची पद्धत
सोयाबीन पिकावर फवारणी करताना पीक उगवणीनंतर २० दिवसांनी सुरुवात करून व त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने ५ टक्के झेंडू पानांचा अर्क एकूण ४ वेळा फवारणी करावी, अशी शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे.